ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - राज्यभरामध्ये बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पुणे शहर आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, कारागृह आणि लोहमार्ग विभागातील ३९७ जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी तब्बल ६० हजार तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजीनगर मुख्यालय, ग्रामीण पोलीस मुख्यालयासह लोहमार्ग मुख्यालयामध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पोलीस भरतीसाठी राज्यभरामधून आॅनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणांनुसार त्यांना संबंधित केंद्रांवर भरतीसाठी जाण्याचे मेसेज आणि माहिती पाठवण्यात आलेली होती. पुणे शहर आयुक्तालयासाठी एकूण २३९ पदे भरण्यात येणार असून त्यासाठी ३५ हजारांच्यावर अर्ज आलेले आहेत. तर ग्रामीण पोलीस आणि कारागृह पोलिसांची भरती प्रक्रिया एकत्रच राबवली जात आहे. ग्रामीण पोलिसांची ८० आणि कारागृहाच्या ४५ जागांसाठी पाषाण येथील मुख्यालयामध्ये प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १६ हजार २४१ अर्ज आले आहेत. तर लोहमार्ग पोलिसांची भरती प्रक्रिया खडकी मुख्यालयात सुरु असून, ३३ जागांसाठी साडे आठ हजार अर्ज आले आहेत. शहरातील भरतीसाठी पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या १ हजार उमेदवारांपैकी ३४८ जण गैरहजर राहीले. तर ८२ जण अपात्र ठरले आहेत. तर ग्रामीण आणि कारागृह भरतीसाठी आलेल्या ७११ जणांपैकी ६८३ जण पात्र ठरले. तर लोहमार्ग पोलीस दलाच्या भरतीसाठी ३७२ जण उपस्थित राहीले होते.
आयुक्तालयाच्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये उमेदवारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच त्यांना स्वच्छतागृहांची आणि पाण्याची सुविधाही देण्यात आली आहे. फळांचे स्टॉल यावेळी लावण्यात आले असून पोलीस कॅन्टीनमधून ते खाद्य पदार्थ विकत घेऊन खाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अरविंद चावरीया यांनी दिली. भरती केंद्रावर डॉक्टरांचे पथक नेमण्यात आलेले असून अत्यावश्यक सुविधांसह सुसज्ज रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तब्बल ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस भरतीसाठी नेमण्यात आले आहेत. उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शारीरिक क्षमता चाचणी तसेच धावणे स्पर्धा ही सकाळी सहा ते साडेनऊच्या दरम्यान घेण्यात येत असल्याचे चावरीया यांनी सांगितले.