पुणे : महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना आता प्रति घर ३० ऐवजी ५० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. समितीने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यास नागरिकांना या कर्मचाऱ्यांना दरमहा ६० रुपये याप्रमाणे कचरावेचकांना वर्षाला ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी हा करार केला जाणार असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले असून, येत्या सोमवारी ( दि. १७) याबाबत निर्णय होणार आहे. शहरात स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. हा कचरा गोळा करताना कचरावेचकांना आवश्यक ते हातमोजे, साहित्य पुरविण्याची जबाबदारी ही पालिकेवर असेल. दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याच्या बदल्यात प्रत्येक घरामागे ३० रुपये घेण्याचा करार यापूर्वी पालिकेने स्वच्छ संस्थेबरोबर केला होता. कचरावेचक अधिक पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे या संस्थेबरोबर करार करताना घालण्यात आलेल्या अटींमध्ये बदल करून त्यानंतरच हा करार करावा, अशी चर्चा पालिकेच्या मुख्य सभेतही झाली होती. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे शक्य होत नसल्याने स्वच्छ संस्थेची मदत घेतली जाते. या कर्मचाऱ्यांना मोबदला म्हणून दरमहा ३० रुपये दिले जात होते. समितीने मान्यता दिल्यास आता नागरिकांना ६० रुपये मोजावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)
स्वच्छता कर्मचाऱ्यांना ५० रुपये
By admin | Updated: August 14, 2015 03:03 IST