पुणे : विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून माहिती संकलित केली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील व संलग्न महाविद्यालयातील वय वर्ष १८ व त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख २२ हजार असल्याचे विद्यापीठातर्फे उच्च शिक्षण विभागाला कळविण्यात आले आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वय १८ व त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने माहितीचे संकलन करण्याचे निर्देश उच्च शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना या वयोगटातील विद्यार्थ्यांची नावे, जन्म दिनांक, वय वर्षे, लिंग, शाखा, वर्ग, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व पत्ता याची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यातील सर्व विद्यापीठांकडून या वयोगटातील विद्यार्थ्यांची माहिती राज्य शासनाकडे सादर केली जाणार आहे. दरम्यान, उच्च शिक्षण विभागाला अद्याप सर्व विद्यापीठांची माहिती प्राप्त झालेली नाही. येत्या एक ते दोन दिवसांत सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची माहिती संकलित होईल, असे उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये कोरोनाविरोधी लस द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे म्हणाले, विद्यापीठामार्फत या वयोगटातील विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाला कळविली आहे. विद्यापीठातील विभागांमधील व संलग्न महाविद्यालयांत ५ लाख २२ हजार इतके विद्यार्थी १८ व त्यापुढील वयोगटातील आहेत. राज्य शासन व उच्च शिक्षण विभागाकडून यापुढे प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणासंदर्भात कार्यवाही केली जाईल.