पुणे : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने सुरू केलेली जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्ह्यातील २०० पैकी ४७ गावे जलयुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. १५ आॅगस्ट रोजी या गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांत ही गावे जलयुक्त झाल्याचा ठराव करण्यात आला आहे.या योजनेंतर्गत २०० गावांची निवड करून ही गावे टंचाईमुक्त करण्याचा अराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेली, तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेली व टंचाईग्रस्त गावे यामध्ये निवडण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० गावे घेण्यात आली आहेत.यामध्ये अभियानात साखळी सिमेंट बंधारे, नालाबांध कार्यक्रम, नाला खोलीकरण, जल व कृषी संधारण, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, पाणी अडवणे व जिरवणे यासाठी चर खोदाई, अशी कामे करण्यात आली आहेत. या २०० गावांमध्ये ७ हजार कामे हाती घेतली होती. यात कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणीपुरवठा, भूजल विभाग ही कामे करीत आहे. आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात ९० टक्क्यांपर्यंत ४७ गावांत कामे झाली आहेत. ५२ गावांत ५० ते ७० टक्के, ५० गावांत ३० ते ४० टक्के, २८ गावांत ३८ टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाली आहे. यातील ९० टक्क्यांपर्यंत कामे ज्या गावांत झाली आहेत. ती गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामसभेत तसा प्रस्ताव ठेवण्यात येऊन आपल्या गावात या योजनेंतर्गत किती कामे व किती खर्च झाला, हे मांडण्यात आले. यावर कोणाच्या सूचना, हरकती, तक्रारी घेण्यात आल्या. यानंतर सर्वांच्या मते गाव जलयुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. कामांसाठी आतापर्यंत ६१ कोटी ७७ लाख इतका निधी खर्च करण्यात येत असून, ३० कोटींचा लोकसहभाग व ३२ कोटींची कामेही शासकीय निधीतून करण्यात येत आहेत. जवळपास पहिल्या टप्प्यातील हा निधी खर्च झाला आहे. (प्रतिनिधी)
४७ गावे झाली जलयुक्त
By admin | Updated: August 20, 2015 02:38 IST