पुणे : दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरून ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या आरोपींना नेपाळला पळून जात असताना त्यातील दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. सहा दिवसात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.केशर प्रेम साही (वय २३, रा. कुंदन इस्टेट, मूळ गाव नेपाळ) आणि कृष्णा ब्रिकबहादूर शाह (वय ३५, रा. नेपाळ) अशी त्यांची नाव आहेत़ त्यांचे साथीदार मुकेश सिंग (वय ३०), त्याची पत्नी पारो (वय २३) हे फरार आहेत. याप्रकरणी आशिष भवरलाल जैन (वय ३९, रा. कुंदन इस्टेट, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली होती.सहायक पोलीस आयुक्त समीश शेख यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वात या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने सुरु केला. ज्या ज्या मार्गानी नेपाळकडे जाण्याची शक्यता आहे. त्या त्या राज्यात तसेच भारत नेपाळ सीमेवर रवाना करण्यात आली. नेपाळकडे जाणारे रेल्वे मार्ग, रेल्वेची वेळापत्रके या ठिकाणांहून नेपाळच्या सीमेपर्यंत रस्ते मार्गे जाणा-या ट्रॅव्हल्स याचा बारकाईने अभ्यास करुन तांत्रिक विश्लेषण करुन गुन्ह्यातील आरोपी हे फरिदाबाद या मार्गे निघून जात असल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली येथून हे आरोपी गाझीयाबाद हायवे मार्गे नेपाळकडे जाण्याची शक्यता होती. सायबर गुन्हे शाखेचे पथक दिल्लीतच यावेळी होते. त्यांच्या मदतीने सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी नेपाळकडे जाणा-या ट्रॅव्हल्सचा पाठलाग करुन या गुन्ह्यातील दोन आरोपींना उत्तर प्रदेशातील हापुड परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ६ लाख ७१ हजार रुपये आणि १२ लाख २५ हजार रुपयांचे डायमंड असलेले सोन्याचे दागिने असा १८ लाख ९६ हजार १३९ रुपयांचा ऐवज जप्त केला.ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, मुरलीधर करपे, अंजूम बागवान, जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, अमोल भोसले, मदन कांबळे, सहायक फौजदार अरविंद चव्हाण, हवालदार असलम अत्तार, संतोष जाधव, मुथय्या, अनिल घाडगे, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार, माने, सागर तोरडमल यांच्या पथकाने केली.नोकरांचे चारित्र्य पडताळणी करणे आवश्यकनागरिकांनी त्यांचे घरात घरकाम करणारे नोकर तसेच वॉचमन म्हणून काम करणा-या प्रत्येक व्यक्तीची पूर्ण माहिती घेऊन स्वत:कडे ठेवावी व जवळच्या पोलीस ठाण्यामधून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
३४ लाख रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्यांना उत्तर प्रदेशात पकडले, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:12 IST