लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गतवर्षी कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन आणि उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पीक कर्जांचे अपेक्षित वाटप झाले नाही. परंतु यंदा जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच अधिकचे लक्ष देऊन बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त व वेळेत पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले. यामुळेच आतापर्यंत २३५८ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २५० कोटींचे कर्ज अधिक वाटप केले आहे. दरम्यान, अद्यापही १५ टक्के उद्दिष्ट बाकी असून, सर्व विशेषतः खासगी बँकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एफआयडीडीचे व्यवस्थापक पीयूष गोयल, नाबार्डचे रोहन मोरे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपमहाव्यवस्थापक वीणा राव, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडूपाटील आणि जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप व विविध सरकारी योजनांच्या कर्ज वाटपासाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, जेणेकरून उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्यासाठी शासकीय योजनांबाबतचा विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेण्यात येईल. कोविड काळातही जिल्ह्यातील बँकांनी समाधानकारक काम केले असून किसान क्रेडीट कार्ड (पीक कर्ज) खरिपाचे २३५८ कोटी ८३ लाख वाटप केले आहेत. ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. खरीप कर्जवाटपाचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी सूक्ष्म नियोजन करावे. पंतप्रधान स्वनिधी योजनेबाबत १६ सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित करावे. युवकांना स्वयंरोजगारासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेअंतर्गत स्थानिक पातळी व संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील विविध बँकांच्या प्रतिनिधींनी मागील सहा महिन्यांच्या कामकाजाचा आढावा सादर केला.