तळेगाव दाभाडे : गुन्हे अन्वेषणची कारवाई तळेगाव दाभाडे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तिघा चोरट्यांना रविवारी अटक करण्यात आली. यामुळे तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीला गेलेल्या दुचाकींचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बबन घारे (रा. डोणे, ता. मावळ), अमित भगवानदास राठोड व मिथुन भारत राठोड (दोघेही रा. पुसाणे, ता.मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कॉन्स्टेबल दत्तात्रेय बनसुडे यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अपर पोलीस अधीक्षक विजय मगर, पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर आणि सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आढले फाटा येथे सापळा रचून संतोष बबन घारे याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने परिसरातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून १९ दुचाकी, तर त्याचे साथीदार अमित राठोड व मिथुन राठोड यांनी ५ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. तिघा चोरट्यांवर चिंचवड, हिंजवडी, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत कॉन्स्टेबल बनसुडे व सतीश कुदळे, हवालदार विजय पाटील, बाळासाहेब सकाटे यांनी भाग घेतला. पुणे शहर आणि परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
२४ दुचाकी जप्त; तीन चोरट्यांना अटक
By admin | Updated: August 18, 2014 05:23 IST