लोकमत न्यूज नेटवर्क
राजेगाव : वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचे दुष्परिणाम मानवी जीवनावर होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळायचा असेल तर प्रदूषण टाळायला हवे, वृक्ष तोड टाळून जास्तीत जास्त झाडे लावयला हवी. यासाठी संपूर्ण भारतात जनजागृती करण्याच्या उद्देशाने दौंड तालुक्यातील दोन तरुणांनी २३०० किमी सायकल प्रवास करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
दौंड तालुक्यातील राजेगाव येथील राजेंद्र कदम आणि पिंपळगाव येथील जयकुमार जावळे अशी या दोन ध्येयवेड्या तरुणाची नावे आहेत. या दोन तरुणांनी तब्बल २३०० किलोमीटर सायकल संदेश यात्रा यशस्वीपणे पार पाडली. १५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या २० दिवसांच्या कालावधीत मुंबई ते हावडा ब्रिज पर्यंत सायकल प्रवास करत त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्रवासादरम्यान त्यांनी व्यसनमुक्त जीवन- चिंतामुक्त जीवन, सायकल चालवा-प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवा, इंधन वाचवा हे संदेश दिले.
कदम यांना २०१८-१९ साली यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला आहे. ते व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते आहेत. गुरुवर्य युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन युवक संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शहाजी काळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रवास यशस्वी केला. सायकल खरेदी व प्रवासखर्च यासाठी आमदार राहुल कुल, शिवसेना जिल्हा उपनेते महेश पासलकर, तुषार थोरात, राजेगाव ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले. येथील ग्रामस्थांनी, बारामती येथील राष्ट्रवादी भवन येथे, भिगवण येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भिगवण सायकल क्लब यांनी कदम यांचा गुणगौरव केला आहे.
कोट
पर्यावरण रक्षणाच्या हेतूने जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही ही संदेश यात्रा काढली होती. प्रवासादरम्याने आमचे अनेक ठिकाणी स्वागत केले. येत्या काळातही या प्रकाच्या संदेश यात्रावर जाण्याचा आमचा मानस आहे.
- राजेंद्र कदम,