पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या बोटीसह २० वाळूचे ट्रक ताब्यात घेऊन साधारणत: ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती तहसलीदार उत्तम दिघे यांनी दिली. बेकायदा वाळूउपसा करण्यासाठी महसूल खात्याने जोरदार मोहीम हाती घेतल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके, मंडल अधिकारी संजय स्वामी, मंडल अधिकारी भालेराव यांच्यासह तलाठी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याकरिता आज पहाटेपासूनच महसूल खात्याच्या पथकाने टेहाळणी सुरू केली. दौंड, कुरकुंभ, पाटस, नानगाव या परिसरात बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेण्यात आले. तसेच, दुपारी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार उत्तम दिघे हे दोघे कारवाई पथकात सहभागी झाले. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास कानगाव येथील भीमा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणारी बोट ताब्यात घेण्यात आली.नदीपात्रातून ही बोट क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गेल्या महिन्यापासून ते आजपावेतो २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कानगावला बोटीसह २० ट्रक जप्त
By admin | Updated: June 21, 2015 00:04 IST