पुणे : कुटुंबीयांसह भुगाव येथे गेलेल्या एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकाच्या घरामध्ये चोरट्यांनी हात साफ करीत १२ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच ते शनिवारी सकाळी पावणेनऊच्या दरम्यान औंधमध्ये घडली. चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चेतन वाकलकर (वय ४६, रा. क्रॉनीफर अपार्टमेंट, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. वाकलकर हे इंदिरा कॉलेजचे संचालक आहेत. ते कुटुंबीयांसह भुगाव येथे कामानिमित्त गेले होते. ते राहात असलेल्या इमारतीमध्येच त्यांची आई राहण्यास आहे. शनिवारी सकाळी सोसायटीचा सुरक्षारक्षक दूध देण्यासाठी त्यांच्या घरी गेला. तेव्हा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. त्यांनी वाकलकर यांच्या आईला जाऊन ही गोष्ट सांगितली. वाकलकर यांच्या आईने यांना फोनवरून घरी चोरी झाल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत चोरी झाली त्या रात्री दोन्ही सुरक्षारक्षक झोपले असल्याचे समोर आले आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे करीत आहेत. (प्रतिनिधी)
औंधमध्ये १२ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: March 27, 2017 03:27 IST