पिंपरी : यमुनानगर, निगडी येथे पत्नी, सासू, सासरा यांनी पेत्रस जॉन मनतोडे यांचा डोक्यात पेव्हिंग ब्लॉक, प्लंबिंग पाना आणि लाकडी दांडके मारून खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराला घडली. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्तिना पेत्रस मनतोडे (वय २८), लुसिया सूर्यकांत बोरडे (वय ५५) , सूर्यकांत संतोष बोरडे (वय ५८) अशी आरोपींची नावे आहेत. अमोल भादू साळुंके यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी - पेत्रस मनतोडे यांचे पत्नी क्रिस्तिना हिच्याशी वारंवार खटके उडत होते. तिला कायम शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. शनिवारी रात्री पेत्रसने पत्नी क्रिस्तिनाला शिवीगाळ केली. त्यातून त्यांच्यात भांडण झाले. क्रिस्तिनाने लाल मिरची पूड त्याच्या डोळ्यांत टाकली. जवळच पडलेला सिमेंट ब्लॉक उचलून पेत्रसच्या डोक्यात मारला. सासरे सूर्यकांत बोरटे यांनी प्लंबिंगचा पाना पेत्रसच्या डोक्यात मारला, तर सासू लुसिया हिने लाकडी धोपाटणे पेत्रसच्या डोक्यात मारले. गंभीर जखमी झालेल्या पेत्रसचा मृत्यू झाला. याप्रकरणीपत्नी, सासू,सासरे या तीन आरोपींविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
By admin | Updated: April 17, 2017 06:40 IST