- देवराम भेगडे, किवळेमहापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटी रस्त्याचे काम तीन भागांत होत असून, किवळे व निगडी दोन्ही बाजूंनी कामे होत असून, आजतागायत दोन्ही बाजूंनी पंधरा टक्के काम पूर्ण झाले आहे. आजतागायत झालेल्या एकूण कामावर साडेअकरा कोटी खर्च झाला आहे. या रस्त्यावर रावेत येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलासाठी ८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, रेल्वेकडून ना हरकत दाखला मिळताच निविदाप्रक्रिया सुरू होणार आहे. किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या या रस्त्याचे गेल्या वर्षी १० जुलैला किवळे व निगडी येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा, अठरा व एकोणीस या तीन प्रभागांतून हा रस्ता विकसित करण्यात येत असून, या रस्त्याचे काम तीन भागांत होत पहिल्या टप्प्यातील किवळे मुकाई चौक ते लोहमार्ग दरम्यानच्या रस्त्याची एकूण लांबी २८५० मीटर राहणार असून, रुंदी ४५ मीटर असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लोहमार्ग ते निगडी भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या कामाची लांबी दीड किलोमीटर राहणार असून, या दोन्ही भागातील कामासाठी ७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामावर एकूण साडेसात कोटी रुपये खर्ची पडले आहेत, तर लोहमार्ग ते निगडीपर्यंतच्या रस्त्याचे सुमारे पंधरा ते वीस टक्के काम पूर्ण होत आले असून, चार कोटी रुपये खर्ची पडले आहेत. किवळे ते निगडी दरम्यान रावेत येथे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, पुलाच्या कामासाठी महापालिकेने ८७ कोटींची तरतूद केली आहे. विकसित होणारा रस्ता असा असेल -४५ मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या मध्यभागी ३.५० मीटर रुंदीच्या स्वतंत्र दोन बीआरटीएस लेन असणार असून, तीन लेनची व्यवस्था -रस्त्याच्या दोन्ही बाजूंस १०.५० मीटर रुंदीची सर्व वाहनांसाठी स्वतंत्र लेन. -रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सायकल व पादचारी मार्ग असणार आहे. मार्गाची अनुक्रमे रुंदी २.५०० मीटर व २.९०० मीटर असणार आहे. -स्वतंत्र बीआरटी लेन व रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील बाजूंसह सायकल मार्ग व पादचारी मार्गावर विद्युतीकरण व्यवस्था -रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्गाजवळ वृक्षारोपण -रस्त्याच्या बाजूंना पाणीपुरवठा वाहिन्या, जलनिस्सारण वाहिन्या, विद्युतवाहिन्या व पावसाळी गटार व्यवस्था करण्यात येणार आहे. रस्त्यामुळे होणारे फायदे -पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील निगडीतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होईल. -किवळे, रावेत, तळवडे, चाकण औद्योगिक क्षेत्र, नाशिक महामार्ग, भोसरी व प्राधिकरण भागातील वाहतुकीसाठी वाहनांच्या इंधनाच्या बचत होईल.-पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड भागातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.-पुण्याहून मुंबईकडे व मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी जवळचा रस्ता होईल. -वाहतूक सुरळीत झाल्यामुळे वेळ वाचेल व प्रदूषण कमी होईल.निगडी भक्ती-शक्ती चौक ते किवळे मुकाई चौक रस्ता विकसित करण्यात येत असून, दोन्ही बाजूंनी पंधरा टक्के काम पूर्ण झाले आहे. आजतागायत झालेल्या कामासाठी साडेअकरा कोटी खर्च झाला असून, रावेत येथील लोहमार्गावरील पुलासाठी ८७ कोटींची तरतूद करण्यात आली असून, रेल्वेकडून ना हरकत दाखला प्राप्त होताच पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. - विजय भोजने, उपअभियंता,तथा प्रवक्ता, बीआरटी विभाग
किवळे-निगडी बीआरटीचे काम अद्याप १५ टक्केच
By admin | Updated: August 13, 2015 04:42 IST