सचिन देव, पिंपरी सुरक्षित ठिकाणी पार्किंग करूनही दुचाकी चोरीला जात आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरात दुचाकी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसातून एक तरी दुचाकी चोरीला जात आहे. दोन वर्षांत परिमंडळ तीनच्या हद्दीतून १ हजार ३४१ दुचाकींची चोरी झाली असून, पोलिसांनी केलेल्या तपासात फक्त ३०१ सापडल्या आहेत. दरम्यान मागील महिन्यातही पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना दाखल झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी, सोनसाखळी चोरी या घटनांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना याहूनही दहापट दुचाकीचोऱ्यांचे वाढले आहे. दुचाकी घरासमोर उभी केलेली असो किंवा सुरक्षित वाहनतळावर उभी केलेली असो. कोणत्याही ठिकाणांहून चोरटे हातोहात दुचाकी चोरून नेत आहेत. रात्रीपेक्षा दिवसाच दुचाकी चोरल्या जात आहेत. परिमंडळ तीनच्या अंतर्गंत येणाऱ्या पिंपरी, भोसरी,निगडी, चिंचवड, एमआयडीसी भोसरी, चतु:श्रृंगी, हिंजवडी, सांगवी आणि वाकड येथून २०१४ मध्ये ६५७ दुचाकी चोरीला गेल्या. पोलीस तपासात फक्त १६० दुचाकी हाती लागल्या. दुचाकीपाठोपाठ तीन चाकी नऊ वाहने चोरीला असून, यामध्ये एकही पोलिसांच्या हाती लागले नाही. तर १२४ चार चाकी वाहने चोरीला गेल्यापैकी फक्त २१ वाहनेच सापडली आहेत. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण त्या वर्षी फक्त २७ टक्केच होते. तर गेल्या वर्षी २०१५ मध्ये ६८४ पैकी १४१ दुचाकी सापडल्या आहेत. तर २२ चोरीला गेलेल्या तीन चाकी वाहनांमध्ये ६ वाहने सापडली आहेत. चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास पोलिसांतर्फे सुरू असून, ज्या दुचाकी सापडल्या आहेत. त्या लवकरच संबंधित मालकांना देण्यात येतील. तसेच नागरिकांनी दुचाकी चोरीला जाऊ नये, यासाठी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून वाहनाला अलार्म सिस्टीम, जीपीएस सिस्टीम या यंत्रणा बसवाव्यात. ही यंत्रणा फारशी खर्चिक नसते. वाहन कोठेही पार्क न करता, अधिकृत ठिकाणीच पार्क करावे.
दुचाकीचोर पोलिसांवर शिरजोर
By admin | Updated: February 4, 2016 01:31 IST