पिंपरी : उद्योगनगरीतून ‘अंडरवर्ल्ड’ला सुमारे दोन कोटींचा महिन्याला हप्ता जातो. या लोकमतच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. हप्ते देणारे नेमके कोण? हप्ते वसुलीची यंत्रणा कशी असेल? याबाबतची नागरिकांची उत्कंठा वाढली. या बातमीसंदर्भात पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करणार, असे त्यांनी सांगितले.पिंपरी-चिंचवडमधील अनेक गुंडांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे बोलले जाते. अनेक गुंड थेट ‘अंडरवर्ल्ड’शी कनेक्ट असून, त्यांच्यामार्फतच हप्तेवसुलीची यंत्रणा कार्यान्वित केली जाते. त्यांच्या माध्यमातून शहरातील लँडमाफिया, बिल्डर, उद्योजक आणि अलीकडच्या काळात अवैध व्यवसायाच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावलेले नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांना हप्त्यांसाठी ‘टार्गेट’ केले जात आहे. दोन नंबरच्या धंद्यातून मिळणाऱ्या पैशांतून काही रक्कम हप्त्यासाठी देण्याची ते तयारी दाखवू लागले आहेत. याबद्दल कोठे वाच्यता केल्यास अडचणीचे, धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या प्रकाराबद्दल कोणी काहीच बोलत नाही. पोलिसांकडे तक्रार करणे तर दूरची बाब आहे. त्यामुळे याकडे पोलिसांचे लक्ष जात नाही. रावेत, सांगवी, भोसरी, चिंचवड, पिंपरी या भागातील काही जण अंडरवर्ल्डच्या गळाला लागले आहेत. नागरिकही आता अलिशान मोटारीतून फिरणाऱ्यांकडे संशयित नजरेने पाहू लागले आहेत. उच्च राहणीमान, आलिशान मोटारी, बंगला, उद्योगधंदे, बोटात अंगठ्या, गळ्यात मोठ्या सोनसाखळ्या घालून मिरविणाऱ्यांकडे हेच लोक हप्ते देणारे असावेत, अशा नजरेतून बघू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून मोठी रक्कम ‘अंडरवर्ल्ड’कडे वळती होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांना वरून फोन येतात, ते आता कायमचे ‘बकरे’ बनले आहेतच. परंतु, बांधकाम व्यावसायिक, टीडीआर किंग, नवे उद्योजक यांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांच्यापर्यंत ही यंत्रणा पोहचली नव्हती, त्यांची आपण गळाला लागतो की काय, या भीतीने गाळण उडाली आहे. (प्रतिनिधी)
‘अंडरवर्ल्ड’च्या हप्तेवसुलीची चौकशी
By admin | Updated: October 5, 2015 01:43 IST