पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात गेल्या दोन दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. अशुद्ध पाणी पिल्याने येथील कर्मचाऱ्यांनाही जुलाब, उलट्याचा त्रास झाला. महापालिका मुख्यालयाशेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. एक लाख लिटर क्षमतेच्या या टाकीतून संपूर्ण इमारतीला पाणीपुरवठा होतो. दर दोन महिन्यांनी टाकीची साफसफाई केली जाते. त्यानुसार चार दिवसांपूर्वी सफाईसाठी टाकी रिकामी करण्यात आली होती. दरम्यान, जलवाहिनींद्वारे रिकामी टाकी भरण्यासाठी वेळ लागत असल्याने टाकीमध्ये टँकरने पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुख्यालयात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शनिवारी अचानक पाण्याची चव बदलली. हे पाणी कर्मचाऱ्यांनी पिल्याने काही कर्मचाऱ्यांना उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. रविवारी कामगार दिनाची सुटी असल्याने फारसे कर्मचारी मुख्यालयात नव्हते. दरम्यान, सोमवारीही महापालिकेतील नळांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे त्रास होत असल्याची बातमी संपूर्ण महापालिकेत पसरली. त्यामुळे सोमवारी दिवसभर येथील कर्मचाऱ्यांनी नळांचे पाणी पिणे टाळले. अनेकांनी कामावर येताना घरूनच पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या होत्या. विकतचे पाणी घेऊन तहान भागविणे पसंत केले. यासह कुलरमध्ये जमा झालेले अशुद्ध पाणी कोणी पिऊ नये यासाठी कुलरदेखील रिकामे करून ठेवले. (प्रतिनिधी)याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मुख्यालयातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. केमिकल अॅनालिसिस झाल्यानंतर नेमके समजेल. - प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता
महापालिकेत अशुद्ध पाणी
By admin | Updated: May 3, 2016 03:33 IST