- संजय माने, पिंपरीमोबाईल, दूरचित्रवाणी संच असो की, अन्य कोणतीही वस्तू; नामांकित कंपनीचे लेबल लावून विकण्याचा गोरखधंदा पिंपरीत जोरात सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल असलेल्या कंपनी कायदातील दाव्यांच्या आधारे सॅमसंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी कॅम्पातील दुकानांवर छापे घालून बनावट विक्रीचा बाजार उघडकीस आणला होता. केवळ मोबाईलसंदर्भात ही कारवाई झाली. परंतु, उल्हासनगरच्या दूरचित्रवाणी संच, डीव्हीडी प्लेअर या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह बरेच काही बनावट पिंपरी बाजारपेठेत राजरोस मिळू लागले आहे. स्वस्तात बनावट (डुप्लिकेट) वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक उल्हासनगरला जात. बनावट वस्तूंची मोठी बाजारपेठ अशी उल्हासनगरची ओळख निर्माण झाली असताना, त्यास पिंपरी बाजारपेठ पर्याय ठरू लागली आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील ग्राहकांना आता उल्हासनगरला दूर अंतरावर जाण्याची गरज नाही. बनावट वस्तू विक्रीचे मोठे केंद्र पिंपरी कॅम्पात तयार झाले आहे. खाद्यपदार्थांपासून, इलेक्ट्रॉनिक वस्तू ते अगदी बनावट मद्यनिर्मितीपर्यंत पिंपरी बाजारपेठेने मजल मारली आहे. बनावट वस्तूंच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. नामांकित कंपनीचे लेबल लावून कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांच्या गळ्यात मारल्या जातात. दुकानदार आवर्जून वॉरंटी-गॅरंटीसुद्धा देतात. परंतु त्याच दुकानात गेले, तर दुरुस्ती अथवा वस्तू बदलून मिळते. मोबाईल कंपन्यांनी विविध ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र सुरू केली आहेत. पिंपरी बाजारपेठेत खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये काही दिवसांतच बिघाड झाला, तर ग्राहक कंपनीच्या सेवा केंद्रात जातात. त्या वेळी तो मोबाईल नामांकित कंपनीचा नसून बनावट आहे, हे ग्राहकाच्या लक्षात येते. कंपनीच्या सेवा केंद्रात (सर्व्हिस सेंटर) त्यांना संबंधित कंपनीचा मोबाईल नसल्याचा स्पष्ट खुलासा होतो. बनावट असल्याने कंपनीकडून मोबाईल दुरुस्त करून दिला जाणार नाही, असे कंपनीच्या सेवा केंद्रातील कर्मचारी, तंत्रज्ञ सांगतात. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात येते. केवळ मोबाईलच नव्हे, तर मोबाईलसाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सुटे भाग यामध्येही बनावटगिरी केली जात असल्याचे ग्राहकांच्या लक्षात येऊ लागले आहे. असे सर्वत्र नामांकित कंपन्यांचे बनावट मोबाईल, तसेच सुटे भाग विक्री होत असल्याचे या छाप्यात निदर्शनास आले. लवकरच पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. क्रमश:बनावटगिरी उघड : दुकानांवर छापेसॅमसंग कंपनीच्या नावे बनावट मोबाईल, तसेच सुटे भाग सर्रासपणे विक्री केले जात असलेल्या सात दुकानांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले. त्या दुकानांत त्यांना मोठ्या प्रमाणावर बनावट माल आढळून आला. न्यू मोबाईल झोन, सी फाईव्ह, चॅनेल फाईव्ह, जय अंबे, सूर्या, साई मोबाईल, जय भवानी या दुकानांमध्ये बनावट माल मिळून आल्याचे कंपनीचे अधिकारी ऋषीकेश सुभेदार यांनी समक्ष पाहिले. दिल्ली उच्च न्यायालयात कंपनीने बनावटगिरी करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाला सादर केलेल्या यादीत पिंपरीतील दुकानांची नावे आहेत.
पिंपरीचे होतेय उल्हासनगर
By admin | Updated: October 20, 2015 03:10 IST