तळवडे : येथील सॉफ्टवेअर चौक ते तळवडे गावठाण या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर अर्वाच्च शिवीगाळ करत बेदम चोप दिला. यापूर्वी याच मार्गावर आयटी अभियंता अंतरा दास हिचा निर्घृण खून झाला असून, अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.सायंकाळी सातच्या सुमारास तळेगाव एमआयडीसीमध्ये काम करणारा तरुण कामावरून घरी जात असताना पाठीमागून मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत ट्रिपल सीट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने संबंधित तरुणाच्या चेहऱ्यावरील गॉगल काढून छेड काढण्याचा प्रयत्न केला. तरुणाने माझा गॉगल का घेतला, गॉगल मला परत करा, असा प्रश्न विचारल्यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्या तरुणाला दुचाकीवरून ओढले आणि भर रस्त्यात बेदम मारहाण केली, हा सर्व प्रकार पाहून एका सॉफ्टवेअर अभियंत्याने विचारपूस करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्याने त्याच्याकडे मोर्चा वळवत त्यालाही मारहाण केली. त्यामुळे अभियंत्याने काढता पाय घेतला. त्यानंतरही या तीन मस्तवाल तरुणांनी सदर दुचाकीस्वाराला मारहाण सुरूच ठेवली. मार खाल्लेल्या तरुणाने पोलिसांना फोन करतो, असे म्हणत सुटकेचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर आणखी चवताळलेल्या तरुणांनी लगेच पोलिसांना फोन कर, आम्ही पोलिसांना घाबरत नाही, त्यांना माझे नाव सांग असे म्हणत तरुणाला जोरदार चोप दिला. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावर जवळपास शंभर-दीडशे बघ्यांची गर्दी जमा झाली; परंतु तरुणाच्या मदतीला जाण्याचे धाडस कोणी दाखविले नाही. बघ्यांची गर्दी वाढत असल्याचे पाहून त्या तीन तरुणांनी काढता पाय घेतला.(वार्ताहर)
तळवडेत प्रवाशाला मारहाण
By admin | Updated: March 26, 2017 01:43 IST