वाकड : मुलगी हे अपत्य झाल्याने (नकुशी) निर्दयी जन्मदात्यांनी तिला झुडपात फेकल्याची घटना समोर आली आहे. रहाटणी येथील साई चौकालगतच्या क्षितिज कॉलनी क्रमांक २ येथील झुडपात अवघ्या एक-दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक बुधवारी (दि. २६) पाचच्या सुमारास आढळून आले. या नकुशीला पोलिसांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत माहिती अशी की, क्षितिज कॉलनी क्रमांक दोन जवळ असलेल्या झुडपातून एका बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याने येथील काही रहिवाशांनी झुडपांत पाहणी केली. नवजात अर्भक उघड्यावर टाकल्याचे त्यांना दिसले. यानंतर नागरिकांनी वाकड पोलिसांना याबाबत माहिती दिली.वाकड पोलिसांनी पाहणी करीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून त्या नकुशीला औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सहायक निरीक्षक वीरेंद्र चव्हाण यांनी सांगितले. याबाबतचा तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
जन्मदात्यांनी फेकलेल्या नकुशीवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:47 IST