पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची मी माहिती घेतली. नऊ महिन्यांचे बाळ असताना कोणीही आत्महत्या करू शकत नाही. काही फोटोही मी पाहिले. त्यावरून असे दिसून येते की, हगवणे कुटुंब राक्षसी आहे. त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी. त्यांना माफ करण्यात येऊ नये किंवा कोणीही सहानुभूती दाखवू नये. अशा प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे, असे मत व्यक्त करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी संताप व्यक्त केला.
वैष्णवीच्या आईवडिलांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेऊन वडेट्टीवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘महिला अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. पाच वर्षात राज्यातील ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. राज्यात दर दोन तास १३ मिनिटांत एका महिलेचा खून होतो किंवा तिच्यावर अत्याचार होतो. यावरून कायद्याचा धाक महाराष्ट्रात दिसत नाही. कायद्याचा बडगा कठोरपणे का उगारला जात नाही. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महिला आयोगाने पूर्ण वेळ दिला पाहिजे. वैष्णवी हगवणे प्रकरणात पहिले काही दिवस महिला आयोगाचा कोणताही ‘रोल’ दिसत नव्हता. आयोगाने पुढे यायला पाहिजे. मात्र, ते यात पुढे येत नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे. याच प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाण फरार आहे, त्याला अटक झाली पाहिजे.’’ मुरलीधर मोहोळ यांच्याकडूनही सांत्वन
केंद्रातील सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कस्पटे कुटुंबियांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेतली. कस्पटे कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.