हिंजवडी : मारूंजी रस्त्यावरील सहा दुकाने आगीत भस्मसात झाली. आगीत जीवितहानी झाली नाही मात्र वीस लाखाहून अधिक नुकसान झाले. शनिवारी (दि. ३) पहाटे सव्वाचारच्या सुमारास मारुंजी रस्त्यावरील लक्ष्मी चौकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मारुंजी येथील पीएमआरडीए आणि एमआयडीसी फेज एकच्या अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात जवानांना यश आले. हिंजवडी मारुंजी रस्त्यावर असलेल्या दुकानांना अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. यामध्ये ऑटो मटेरियल्स, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, कपड्याचे शोरूम, किचन ट्रॉली, ग्लास वर्क, तसेच दुचाकीचे गॅरेज यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला. पीएमआरडीए अग्निशामक दल उपस्थानक अधिकारी विजय महाजन, एमआयडीसी केंद्र अधिकारी रामदास चोरगे तसेच कर्मचाºयांनी चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
मारुंजी रस्त्यावरील सहा दुकाने आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:52 IST