पिंपरी : जनता शिक्षण संस्थेचे शाळा सोडल्याचे सहा बनावट दाखले जप्त केल्याची कारवाई सांगवी पोलिसांनी बुधवार (दि. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास जुनी सांगवीतील माकन चौक येथे केली आहे. या प्रकरणी प्रफुल्ल नारायण भालेराव (वय २८, रा. काटे चाळ, दापोडी) याला अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश शिवतरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात गस्तीवर होते. त्या वेळी आरोपी प्रफुल्ल हा दुचाकीवर माकन चौकात संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसून आले. प्रफुल्लची दुचाकी थांबवून त्याच्या जवळील कॅरिबॅग तपासली असता, त्यात जनता शिक्षण संस्थेचे इयत्ता आठवी पासचे शाळा सोडल्याचे बनावट दाखले आढळून आले. या वेळी पोलिसांनी प्रफुल्लची चौकशी केली असता, त्याने मोटार चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आठवी पास असणे गरजेचे असते. जो आठवी पास नसेल, त्याला आठवी पासचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला काढून देतो, असे सांगितले. त्यांच्या जवळून सहा बनावटीचे दाखले जप्त करण्यात येऊन सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शाळेचे बनावट दाखले जप्त
By admin | Updated: July 8, 2016 03:55 IST