देहूरोड : रक्षा संपदा विभागाच्या वतीने चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अभिजित सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चार महिन्यांपूर्वी तत्कालीन सीईओ अभिषेक त्रिपाठी यांची तडकाफडकी कोलकाता येथे बदली झाली होती. त्यांनतर खडकी कॅन्टोन्मेंटचे सीईओ अमोल जगताप यांच्याकडे देहूरोडचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. गतवर्षी डिसेंबरमध्ये बोर्डाच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत झालेल्या मासिक बैठकीत बोर्डाच्या अर्थ समिती अध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण यांच्याशी बैठकीत त्यांचे प्रस्ताव समाविष्ट न केल्याच्या कारणास्तव वादावादी झाली होती. तसेच पिंजण यांनी त्रिपाठी यांच्या विरोधात उद्धट वर्तणूक, देहूरोड बोर्डावर एक वर्षात दोनदा सीबीआयने केलेली कारवाई, तसेच इतर काही मुद्द्यांवर खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तक्रार केली होती. खासदार बारणे यांनी पिंजण व नागरिकांच्या त्रिपाठी यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे एका पत्राद्वारे त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी रक्षासंपदा विभागाच्या सह महासंचालक विवेक कुमार यांनी जारी केला आहे. (वार्ताहर)
देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या सीईओपदी सानप
By admin | Updated: April 24, 2016 04:24 IST