पिंपरी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तर मिनी मॅरेथॉन स्पर्धेत साप्रस, खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग गु्रपच्या (बीईजी) नवीन होडा व पुण्यातील राष्ट्रीय धावपटू मनीषा साळुंखे यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाची शर्यत जिंकत ‘प्रेसिडेंट ट्रॉफी’चे मानकरी ठरले. ७ हजार स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेत स्वच्छ भारताचा संदेश दिला. ‘स्वच्छ भारत’चा संदेश देत प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा रविवारी खडकी येथे उत्साहात पार पडली. पुरुषांच्या गटात प्रथम दहाही क्रमांक बीईजीच्या लष्करी धावपटूंनी काबीज करीत वर्चस्व गाजविले. शर्यतीचे चौका-चौकांत स्वागत केले गेले. बोर्डाचे अध्यक्ष अनुराग भसीन यांच्या हस्ते ध्वज दाखवून शर्यतीला सीएएफव्हीडी मैदान येथून सुरुवात झाली. चषक, पदक आणि रोख रक्कम असे बक्षीस वितरण लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे मुख्य निर्देशक जिग्नेश्वर शर्मा यांच्या हस्ते झाले. मुख्यालयाचे संचालक गीता कश्यम, के. जे. एस. चौहान, भसीन, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, मुख्याधिकारी अमोल जगताप, नगरसेवक अभय सावंत, कमलेश चासकर, दुर्योधन भापकर, मनीष आनंद, पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, वैशाली पहिलवान, पंचप्रमुख विजय बेंगळे, बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभात बीईजीच्या पथकांने मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. शीख समाजपथकाच्या मर्दानी खेळास उपस्थितांनी दाद दिली. कार्यालय अधीक्षक सुजा जेम्स यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
साळुंखे, होडा विजेते
By admin | Updated: January 25, 2016 00:52 IST