पिंपरी : शहरातील प्रत्येक बाजारपेठेत, महत्त्वाच्या चौकात, अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी लक्ष्मीपूजनाचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती. अगदी छोट्या स्टॉलपासून ते मॉलपर्यंत सर्वच ठिकाणी दिवाळीसाठी उपयुक्त वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. विविध प्रकारच्या पणत्या, उटणे, फुले, ऊस, आकाशकंदील, लाह्या-बत्ताशे, फळे, फटाके असे अनेक स्टॉल शहरात दिसून येत होते. आकुर्डी, पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, शाहूनगर, मोरेवस्ती, चिखली, पिंपळे गुरव, कासारवाडी, भोसरी, निगडी, काळेवाडी, डांगे चौक या भागात नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बहुतांश नागरिक आपल्या घराजवळच्या बाजारातच खरेदी करतात.अनेक ठिकाणी लागलेल्या स्टॉलमुळे शहरातील अनेक भागांना बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले होते. हंगामी विक्रेत्यांनीही दिवाळीचा पुरेपूर फायदा घेत या सणाला उपयुक्त असणाऱ्या काही ना काही वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच पोते टाकून, खाट मांडून, हातगाडी लावून, उभे राहून आकर्षक मांडणी करून विक्रेते आपल्या वस्तू विकत होते. मुले, महिला, अनेक वृद्धसुद्धा विक्रीसाठी सज्ज झालेले दिसून येत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच विक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. १० वाजल्यानंतर रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली. नागरिकांना खरेदीसाठी अनेक पर्याय असल्याने एका स्टॉलवर चौकशी करून दुसऱ्या स्टॉलवर जात होते. अत्तर, अगरबत्ती, रांगोळी, तसेच रांगोळीचे छाप अशा अनेक वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. जेथे कमी किमतीत साहित्य मिळेल, तेथे नागरिक गर्दी करत होते. (प्रतिनिधी)
लक्ष्मीपूजनासाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2015 01:26 IST