हिंजवडी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर, आपल्या तालुक्यात व आपल्या समर्थकांना ही पदे मिळावीत, यासाठी तालुक्यातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी, विविध समित्यांच्या ४ सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचेच सदस्य निवडून येणार, हे निश्चित आहे. यामध्ये येत्या मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर सभापती पदांसाठी निवडणूक होईल. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना ज्या तालुक्यात पक्षाचे सर्वांधिक उमेदवार निवडून येतील, त्यांनाच अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदे देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. पवार यांच्या या निकषानुसार अध्यक्षपदावर खऱ्या अर्थांने बारामती तालुक्याचा दावा असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी (ओबीसी) आरक्षित आहे. अध्यक्षपदाची माळ यंदा जुन्नर अथवा बारामती तालुक्याच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी
By admin | Updated: March 20, 2017 04:19 IST