शीतल आल्हाट, पिंपरीदिवाळी सुरू होताच फटाक्यांचे आवाज कानावर पडतात. पर्यावरणासाठी बाधक ठरेल, अशा पद्धतीची फटाक्यांची आतषबाजी न करता दर्शन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. ‘फटाकेविना दिवाळी, सबकी खुशहाली’ हा मंत्र पिंपरीतील दर्शन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीत आपल्या कृतीतून जपला. दिवाळी आणि फटाके जवळचा संबंध असला, तरी तो पर्यावरणाला घातक आहे. परिणामी, हे नागरिकांना त्रासदायक आहे, हे विद्यार्थ्यांनी अभियानाच्या माध्यमातून पटवून दिले. शनिवारी ७ नोव्हेंबरला भक्ती- शक्ती चौकात जनजागृती मोहीम राबवून त्याअंतर्गत विविध कार्यक्रम सादर केले. शाळेतील ध्वनी सावंत व नयना या विद्यार्थिनींनी प्रदूषणमुक्त दिवाळीवर कवितेच्या माध्यमातून फटाक्यांचे विपरीत परिणाम समजून सांगितले. नाटिका सादर करून पर्यावरणाविषयीची जागृती या वेळी केली. पात्रातील विद्यार्थ्यांनी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे काय-काय दुष्पपरिणाम होतात, याद्दलची माहिती नाटिकेद्वारे सादर केली. दिवाळीमध्ये फटाके खरेदी करतात. फटाक्यांमध्ये सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट, सेव्हन शॉट अशा आवाज करणाऱ्या फटाक्यांची सध्या क्रेझ वाढली आहे. नुसते आवाज करणारे फटाकेच नाहीत, तर महागडे फटाके खरेदी करण्याकडेही अधिक कल दिसून येत आहे. फटाक्यांवर अनाठायी पैसा खर्च होतो, शिवाय ध्वनिप्रदूषणात भर पडते. हवेत धूर पसरून आजार वाढतात. हृदयाचे ठोके वाढून रक्ताभिसरणाचा वेग आणि रक्तदाब वाढतो. मानसिक अस्वस्थता, राग, डोकेदुखी, संवादातील अडचणी, मुलांच्या अभ्यासात येणारे अडथळे, बहिरेपणाचे परिणाम होतात, हे टाळण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
‘दर्शन’च्या विद्यार्थ्यांची प्रदूषणमुक्त दिवाळी
By admin | Updated: November 11, 2015 01:23 IST