बलभीम भोसले, पिंपळे गुरवसांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिकांनी व उद्योजकांनी पदपथावर वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत. त्यामुळे पादचारी मार्गाची दुर्दशा झाली असून, पदपथ असून अडचण, नसून खोळंबा याप्रमाणे स्थिती बनली आहे. या पदपथावर खासगी व्यावसायिकांची मक्तेदारी वाढत आहे. या पदपथांचा वापर पादचाऱ्यांसाठी न होता व्यवसायासाठी होत आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या म्हणीप्रमाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रहिवाशांमध्ये आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, सुदर्शननगर व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांसाठी सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या पदपथावर पादचाऱ्यांचा हक्क न राहता, खासगी व्यावसायिक व उद्योजकांनी जणू आपला सातबारा कोरला आहे. या पदपथांचा वापर वाहनतळ, बांधकामाचे साहित्य, दुकानाचे फलक व विक्रीसाठी असलेले साहित्य ठेवण्यासाठी उपयोग होत आहे. या पदपथावर नागरिकांना चालता येत नाही कारण दुकानदार सकाळीच आपल्या दुकानातील साहित्य पदपथावर आणून मांडतात. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कोठून, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी रस्ता वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जुनी सांगवीतील शिताळे मार्केट चौक, नवी सांगवीतील कृष्णा चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, नवीन ६० फुटी रस्ता, सुदर्शननगर येथील सृष्टी चौक आदी ठिकाणचे पदपथ व्यावसायिकांनी बळकावल्याने पादचाऱ्यांना वर्दळीच्या मार्गावरून प्रवास करावा लागतो. सुरेश जाधवर म्हणाले, ‘‘सांगवी, पिंपळे गुरवमधील मुख्य चौकामध्ये बाजारपेठ आहे. या चौकांमध्ये खासगी व्यावसायिकांनी साहित्य पदपथावर मांडल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शाळकरी मुलांना रत्यावरून चालावे लागते. वाहनांमुळे अपघात झाले आहेत.’’दुकानदारांनी आपले साहित्य पदपथावर मांडत असताना स्थानिक रहिवासी पदपथावरून ये-जा करतात. या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. चार पैसे मिळवण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम दुकादारांनी करू नये. आपल्या दुकानाचा त्रास इतरांना होणार नाही, या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाकडून कारवाई होते. मात्र ती ठरावीक वेळेपुरतीच होते. ही कारवाई अखंडपणे सुरु राहणे गरजेचे आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक
व्यावसायिकांचा पदपथावर कब्जा
By admin | Updated: October 28, 2015 01:26 IST