श्रीकृष्ण घुगे, पुणेकेशवनगर-मुंढवा रॉकेल प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, सील करण्यात आलेला रॉकेलसाठा पुरवठा विभागाची परवानगी न घेता तोडल्याने मुंढवा पोलिसांना अन्नधान्य वितरण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निळ्या रंगाच्या रॉकेलचा ११ हजार ६७८ लिटर साठा अनधिकृतरीत्या आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक छाया माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी विमल मुळीक व अतुल मुळीक यांच्याविरोधात ११ जुलैला गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी अद्याप हा कोटा कोणकोणत्या दुकानदारांचा तसेच यात कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होऊ शकला नाही. पुरवठा विभाग रजिस्टर तपासणी सुरू असल्याचे, तर पोलीस हे काम पुरवठा विभागाचे व तपास सुरू असल्याचे सांगत असल्याने यातील मुख्य सूत्रधारापर्यंत यंत्रणा कधी पोहोचणार हा प्रश्नच आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केशवनगर येथे सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी रणजित भोसले, परिमंडळ अधिकारी आर. ए. ताडगे, पुरवठा निरीक्षक छाया माने, सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा घागे, तुषार भिवरकर, आदींसह पंच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी रॉकेल पुरवठा दुकानदारांना वितरित करण्यात आले.
पुरवठा विभागाची पोलिसांना नोटीस
By admin | Updated: July 22, 2015 02:52 IST