पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून मंगळवार, दि. १५ रोजी प्रकाशित झाल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेऊन, राष्ट्रवादीच्या गटनेत्या मंगला कदम यांनी महापालिकेचे सहायक आयुक्तांना धारेवर धरून ताबडतोब तेथील समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते शुक्रवारी निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत.शहरातील बेघर व निराश्रित व्यक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने जानेवारी २०१२ पासून मंडईजवळील व्यंकटेश मार्केटच्या तळमजल्यावर प्रशस्त आवारात रात्र निवारा केंद्र सुरूकेले आहे. सर्व प्राथमिक सुविधा उत्तम प्रकारे मिळणार असल्याचा सूचनाफलकही महापालिकेने लावला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, या ठिकाणी कोणत्याही सुविधा योग्य नसून, निवारा केंद्राची दुरवस्था दिसून आली. पाण्याची सोय नाही, दुर्गंधी पसरलेली, गळणारे छत, अंथरुणाची दुरवस्था, पथदिवे नाहीत. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर या वृत्ताची महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवारा केंद्राच्या देखरेखीसाठी महापालिका प्रशासन एकता प्रतिष्ठान या संस्थेला दरमहा ५० हजार रुपये मोजत असतानासुद्धा निवारा केंद्राची दुरवस्था का झाली आहे, पाण्याची व्यवस्था अद्याप का झाली नाही. बेघरांचा अल्प प्रतिसाद असतानाही प्रतिसाद वाढविण्याकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले, असे विविध प्रश्न कदम यांनी सहायक आयुक्तांना विचारले. तसेच निवारा केंद्राच्या अधिक माहितीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी पाठवून अहवाल मागविला आहे. तसेच निवारा केंद्र हे बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, वायसीएम हॉस्पिटल येथील परिसरामध्ये सुरू करण्यासाठी स्वत: जागेचा शोध घेणार आहेत. या संदर्भात दंडवते निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत. एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालकांची बैठकही घेणार आहेत. (प्रतिनिधी)
रात्र निवारा केंद्राच्या दुरवस्थेची होणार आज पाहणी
By admin | Updated: September 18, 2015 01:56 IST