पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रथमच आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी पिंपरीला मंत्रिपद देण्यात येणार आहे, अशी चर्चा तीन वर्षांपासून सुरू आहे. मंत्रिपद मिळाले, अशी आवईही शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर उठविली जात आहे. त्यामुळे शहरवासीयांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार, की नेत्यांकडून गाजर मिळणार याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आणि राष्टÑवादीतील प्रमुख मोहरे भाजपात घेतले. महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजपातील सर्व नेत्यांच्या मदतीने भाजपाची नगरसेवक संख्या तीनवरून ७७ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे नेतृत्व जगताप आणि लांडगे करतील, त्यांनी पारदर्शक कारभार करावा, असे निर्देश भोसरीतील कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होेते. राष्ट्रवादीची निम्मी टीम भाजपात दाखल झाल्याने महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकाविणे सोपे झाले.जगताप की लांडगे; संधी कोणाला?महापालिकेत यश मिळाल्यानंतर या शहराला मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यावर जगताप-लांडगे यांच्यापैकी कोणास संधी मिळणार, ही चर्चाही रंगू लागली आहे. दसरा, दिवाळीपासून ही चर्चा अधिक रंगली आहे. सोशल मीडियावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दिवाळीचाही मुहूर्त हुकला. लांडगे यांना क्रीडा मंत्रालय आणि जगतापांना राज्यमंत्रिपद मिळणार अशीही चर्चा आहे. जगतापांना मंत्रिपद दिले, तर लांडगे नाराज होतील, लांडगेंना दिले तर जगताप. त्यामुळे नाराजी ओढवून न घेण्याची दक्षता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या आझम पानसरे यांनाही महामंडळ मिळणार ही चर्चा आहे. मात्र, निर्णय झालेला नाही.पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळावे, यासाठी सर्वच भाजपाचे नेते आग्रही आहेत.
मंत्रिपदाची आवई सोशल मीडियावर, पक्षश्रेष्ठींनी शहरातील स्थानिक नेत्यांना ठेवले झुलवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:27 IST