उर्से : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहाला संपला. गेल्या आठवडाभरात प्रचाराची राळ उडाली होती. लाखो रुपये उमेदवारांनी खर्च केले. मावळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. जिल्ह्यातील ६१२ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ आॅगस्ट) मतदान होत आहे. त्याची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय ७ पोटनिवडणुकांसाठीही मतदान होत आहे़ शहरातील निवडणुकीप्रमाणे या वेळी ग्रामपंचायत निवडणूक लढली जाणार आहे. एका ग्रामपंचायतीसाठी जवळपास २५ ते ३०-३२ उमेदवार रिंगणात असल्याने तालुक्यात जवळपास १२०० उमेदवार भविष्य आजमावत आहेत. कोणी जागा विकून, कोणी कर्ज घेऊन, कोणी उधार पैसे घेऊन, तर कोणी आपल्या नात्यागोत्यातून लाखो रुपये घेऊन मतदारांवर उधळीत आहेत.२५ हजारांची खर्चमर्यादा कित्येक पटींत ओलांडणाऱ्या काही उमेदवारांमुळे मतदारराजा खुशीत आहे. एक उमेदवार ४ ते ५ लाखांपर्यंत खर्च करीत असल्याने एका गावातून एक ते दीड कोटी रुपये खर्च होत आहे. तालुक्यातील सर्व उमेदवारांचा ५० कोटींच्या आसपास हा खर्च होत आहे.मतदारांना रोख पैसे वाटण्यापासून आकर्षक वस्तू वाटण्यावर वारेमाप खर्च केला जात आहे. हॉटेल, ढाबे यांचा दररोजचा लाखो रुपयांचा गल्ला होत आहे. दारूचा धंदाही तेजीत आहे. लाखो रुपये खर्च होत आहे. (वार्ताहर)
मावळात कोट्यवधींचा चुराडा
By admin | Updated: August 3, 2015 04:20 IST