Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 08:18 PM2019-10-03T20:18:43+5:302019-10-03T20:22:16+5:30

मावळ विधानसभा निवडणूक 2019: गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या.

Maharashtra Election 2019: Formula of 1995 in Maval or hat trick by Minister of State for Children Bala Bhegde? | Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

googlenewsNext

हणमंत पाटील  

पिंपरी : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मावळात १९९५ ला भाजपाने बंडखोरी करणारांना तिकीट देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी होत आहेत. भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एक पाऊल मागे घेत ‘१९९५ च्या फॉर्म्युल्या’नुसार त्याच पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यशस्वी करायचा की राज्यमंत्री बाळा भेगडे यांना हॅट्ट्रिक करू द्यायची याचा निर्णय मावळवासीयांच्या हाती आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. त्यानंतर सलग दोन वेळा दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे निवडून आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी त्यांनी मावळात आणला. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी तिसºयांदा उमेदवारीवर दावा केला.

Image result for मावळ विधानसभा बाळा भेगडे

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे कार्यकर्ते व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, तसेच पक्ष संघटनेतील युवा कार्यकर्ते रवींद्र भेगडे यांनीही मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केला होता. भाजपाकडून तिन्ही इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने बंडखोरीच्या भीतीने पहिल्या यादीत मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने पुन्हा एकदा बाळा भेगडे यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षातील बंडखोरीचे आव्हान बाळा भेगडेंपुढे आहे. या निवडणुकीतील समीकरणामुळे सर्वांना १९९५ च्या निवडणूक फॉर्म्युल्याची आठवण ताजी झाली आहे.

भाजपातील बंडखोरीने राष्ट्रवादीला ताकद
गेल्या काही वर्षांच्या इतिहासात मावळ भाजपात बंडखोरी झालेली नाही. परंतु, राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली. त्यामुळे सुनील शेळके यांनी भाजपा नगरसेवक पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत ऐनवेळी प्रवेश करीत उमेदवारी स्वीकारली. तसेच, रवींद्र भेगडे यांनीही बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपातील बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एक पाऊल मागे घेत आयात सुनील शेळके यांचा स्वीकार केला. शिवाय राष्ट्रवादीतून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या बाळासाहेब नेवाळे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपातील गटबाजीचा व बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी होण्याची शक्यता आहे.

Image result for मावळ विधानसभा बाळा भेगडे
मावळ विधानसभा निवडणुकीवर एक दृष्टिक्षेप
१९५२ सरदार वीरधवल  दाभाडे अपक्ष
१९५७ रामभाऊ म्हाळगी जनसंघ (भाजपा)
१९६२ नामदेव मोहळ काँग्रेस
१९६७ रघुनाथ सातकर काँग्रेस
१९७२ कृष्णराव भेगडे जनसंघ (भाजपा)
१९७८ कृष्णराव भेगडे काँग्रेस
१९८० अ‍ॅड. बी. एस. गाडे पाटील काँग्रेस
१९८५ अ‍ॅड. मदन बाफना काँग्रेस
१९९०   अ‍ॅड. मदन बाफना काँग्रेस
१९९५ रुपलेखा ढोरे भाजपा
१९९९ दिगंबर भेगडे भाजपा
२००४ दिगंबर भेगडे भाजपा
२००९ बाळा भेगडे भाजपा
२०१४ बाळा भेगडे भाजपा

काय आहे १९९५ चा फार्म्युला?
मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. त्यापूर्वी १९५७ ला जनसंघाचे (पूर्वीचा भाजपा) रामभाऊ म्हाळगी आणि १९७२ ला कृष्णराव भेगडे निवडून आले होते. १९५७ व १९७२चा अपवाद वगळता १९६२, १९६७, १९७८, १९८०, १९८५, १९९० या सहा निवडणुकांत काँग्रेस पक्षानेच मावळ मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे पूर्वी मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. या वर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रुपलेखा ढोरे यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षांपासून भाजपाचे उमेदवार या मतदारसंघात विजयी होत आहेत. आताच्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा ‘१९९५ च्या फॉर्म्युल्या’प्रमाणे काँग्रेसच्या ऐवजी भाजपात बंडखोरी झाली आहे. भाजपातून बंडखोरी केलेल्या सुनील शेळके यांना राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची उमेदवारी ऐनवेळी देण्यात आली आहे. त्यामुळे मावळवासीयांच्या १९९५ च्या निवडणूक फॉर्म्युल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

Web Title: Maharashtra Election 2019: Formula of 1995 in Maval or hat trick by Minister of State for Children Bala Bhegde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.