खडकी : लग्नबस्ता खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या खडकीत दर वर्षी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. दिवाळीनंतर तुळशी लग्न झाले, की खडकीत बस्त्यासाठी प्रत्येक दुकानात ग्राहक दिसतात. मागील अनेक वर्षे खडकीला बस्त्यासाठी प्रथम पसंती दाखवली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लग्नबस्त्यासाठी प्रसिद्ध अशा या बाजारपेठेची उलाढाल कोटींच्या घरात गेली आहे.कमी खर्चात दर्जेदार कपडे, नवरदेवाचा पोशाख, नवरी मुलीचा शालू, काठपदर साडी, पैठणी, सहावारी-नऊवारी साडी, भरजरी-टिकल्याच्या साड्या, मानपानाच्या आदी सर्व वस्तू खडकीत एकाच दुकानात मिळत असल्यामुळे ग्राहकांची वेळ व पैसेही वाचतात. शिवाय एकाच ठिकाणी सर्व खरेदी होते.सध्या कोठेही खरेदीसाठी गेलो तर एकच भाव असा फलक प्रत्येक दुकानात पाहावयास मिळतो. मात्र खडकी याला अपवाद ठरत आहे. खडकीत बस्त्यामध्ये खूप घासाघीस केली जाते. लाख ते सव्वा लाख रुपयांचा बस्ता खडकीत ग्राहक भाव करुन साधारण ६० ते ७० हजार रुपयांच्या आत घेतात. दुकानदारही जास्त घासाघीस न करता ग्राहकांना कमी-जास्त करून बस्ता देतात. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान असते. (वार्ताहर)
लग्नखरेदीसाठी खडकीला पसंती
By admin | Updated: January 26, 2017 00:13 IST