पवनानगर : आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गण आणि गटाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.दसऱ्याच्या अगोदर आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी सोशल मीडियावरून मतदारांना सणाच्या शुभेच्छा पाठवून संपर्काची संधी साधली. दोन आठवड्यानंतर येणारा दिवाळी सणही इच्छुकांना निवडणूकपूर्व प्रचाराची संधी घेऊन आला आहे. सोशल मीडियावर संदेश पाठविताना केवळ राज्य पातळीवरील नेत्यांच्या छायाचित्रांचा आधार घेत आपण आपण कुठल्याच गटाचे नाही, केवळ पक्षाचे पाईक आहोत, हे ठसविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, महिलांसाठी आरक्षण असलेल्या गणातील इच्छुक महिलांसोबतच त्यांच्या पतिराजांची छायाचित्रे झळकत आहेत. ‘लक्ष २०१७ पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद’ असा उल्लेख असून, आता ‘रडायचं नाय, लढायचे, एकच वादा ...तुमचा लाडका, माणसातला माणूस, कोणासाठी मावळच्या विकासासाठी, असे वेगवेगळे शब्दप्रयोग करून मतदारांवर आपली छाप पाडण्यासाठी इच्छुकांनी सुरुवात केली आहे. पक्षातील प्रमुख मंडळींच्या पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू केल्या असल्याचे दिसून येत आहे. गाव पक्षातील प्रमुख प्रचार यंत्रणेतील लोकांसाठी जेवणावळी सुरू झाल्या आहेत. जणू पक्षाने आपल्यालाच उमेदवारी निश्चित केली असल्याचे काही इच्छुक भासवत आहेत. (वार्ताहर)
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
By admin | Updated: October 14, 2016 05:34 IST