पिंपरी : सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. मूळ परभणी जिल्ह्यातील असलेल्या पूजा गजानन निर्वळ (वय २२) या विवाहितेने पुण्याच्या खेड तालुक्यातील महाळुंगे येथे २७ एप्रिल रोजी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी पूजाचा पती आणि तिच्या नणंदेला ताब्यात घेतले आहे.
गजानन मुंजाजी निर्वळ (२७, रा. खराबवाडी, महाळुंगे, पुणे मूळगाव शेलवाडी, ता. शेलू, जि. परभणी) आणि नणंद राधा यादव (३१, रा. खराबवाडी, ता. खेड, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पूजाचे वडील गणेश मारुतराव बोचरे (४५, रा. तुळजापूर, ता. जि. परभणी) यांनी याप्रकरणी १ मे २०२५ रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि गजानन निर्वळ हे दाम्पत्य खेड तालुक्यातील खराबवाडी येथे वास्तव्यास होते. पूजाने सासरच्या अत्याचाराला कंटाळून लग्नानंतर पाच महिन्यांत २७ एप्रिल २०२५ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण?
लग्नानंतर पूजा ही पती गजाननसह सासू-सासरे, नणंद व तिच्या दोन मुलांसह खराबवाडी येथे राहायला आली. सुरुवातीचे तीन महिने आनंदात गेले. मात्र, नंतर गाडी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आण, असा तगादा पती गजानन निर्वळ याने पूजाकडे लावला. मात्र, आधीच लग्नाचीच उसनवारी झाल्याने वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. येथूनच पूजाला पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर खळबळ
पूजा हिच्या आत्महत्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान संबंधित संशयितांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. सोमवारी (२६ मे) खेड (जि. पुणे) न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत लोकमतने रविवारी (दि. २५ मे) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. संशयितांना अटक करून पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी बातमीमधून करण्यात आली. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले.
तपास पथकाने गाठले शेलू
पूजा हिचा पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यादव हे त्यांच्या मूळ गावी गेल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने परभणी जिल्ह्यातील शेलू गाठले. तेथून रविवारी (२५ मे) सायंकाळी गजानन आणि राधा या दोघांना ताब्यात घेतले.