पिंपरी : मावळ गोळीबारात शहीद शेतकऱ्यांच्या दोन वारसांना महापालिकेतर्फे आठवडाभरात नोकरीबाबत नियुक्तीपत्र दिले जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात चार वर्षांपूर्वी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि श्यामराव तुपे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा महापालिकेने केले होती. मात्र, चार वर्षे हा प्रश्न सुटला नव्हता. साठे यांचा मुलगा अक्षय साठे यांना शिपाई, तुपे यांच्या पत्नी हौसाबाई तुपे यांना मजूर म्हणून नोकरी देण्याला महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी मंजुरी दिली आहे. तसेच, महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून पुढील कार्यवाही पूर्ण झाली. दोन्ही वारसांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होणार आहे.कांताबाई ठाकर यांचा मुलगा नितीन ठाकर यांच्यावर फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे ठाकर यांच्या चारित्र्य पडताळणीबाबत तांत्रिक अडचण सोडविल्यानंतर त्यांनादेखील महापालिकेच्या सेवेत दाखल करून घेतले जाणार आहे.याबाबत पिंपरी-चिंचवड प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे म्हणाले, ‘‘ठाकर यांच्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समितीच्या बैठकीत होईल. त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.’’ (प्रतिनिधी)
वारसांना आठवडाभरात नोकरी
By admin | Updated: August 14, 2015 03:11 IST