तळेगाव दाभाडे : गणेशोत्सवादरम्यान रंगेहात पकडलेल्या सोनसाखळी चोरट्याकडून तळेगाव पोलिसांनी सात गुन्हे उघडकीस आणले असून, त्यातील १७ तोळे सोन्याचे ३ लाख १२ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.तळेगाव दाभाडे व स्टेशन परिसरात गेल्या सहा महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या एकूण आठ घटना घडल्या. त्यांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पकडलेल्या महंमद शहाबुद्दीन इराणी (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) व महंमद आनू सय्यद (वय २५, रा. कांडा नेरूळ, ता. कर्जत, जि. रायगड) यांना पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांच्या तपासात तळेगावातील संध्या सुरेश मुंडर्गी, धरमीबाई पारसमल जैन, पूजा मिलिंद देसाई, सुचेता मंदार बेदरकर, रामचंद्र भागूजी आमले, कल्पना सुभाष भोरे व सुजाता शशीकुमार नायर यांचे चोरून नेलेले दागिने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. १९ सप्टेंंबरला मुंडर्गी यांचे मंगळसूत्र हिसकावून पळवून नेत असताना राव कॉलनी विकास प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी इराणी व सय्यद यांना धाडसाने पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे दोघेही सराईत सोनसाखळी चोर आहेत. या वेळी नगराध्यक्षा माया भेगडे, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील, गजानन जाधव आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
चोरलेले १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत
By admin | Updated: October 19, 2015 01:49 IST