पिंपरी : लाखो रुपये खर्च करून महापालिकेतर्फे महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र, त्याचा लाभ स्थानिक खेळाडूंना कमी आणि चमकोगिरी करणाऱ्या आयोजकांना अधिक होतो. सध्या सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत सर्वेसर्वा असल्याच्या आविभार्वात आयोजक स्वत:ला मिरवून घेत आहेत. या चमकोगिरीची शहरात चर्चा सुरू आहे. विविध खेळांबरोबर स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे मान्यताप्राप्त अधिकृत खेळांची महापौर चषक क्रीडा स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. त्यासाठी दर वर्षी करदात्यांचे लाखो रुपये महापालिका खर्च करते. स्पर्धेच्या खर्चातील सर्वाधिक वाटा महापालिकेचा असतो. मात्र, खेळाडूंना वाऱ्यावर सोडून आयोजक असलेले क्रीडा क्लब, संघटनेचे प्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधीच प्रसिद्धीची हौस भागवून घेतात. स्पर्धेच्या ठिकाणी आणि शहरभर फ्लेक्स लावून आपली प्रतिमा झळकावून घेतात. हा प्रकार सर्वांनाच ज्ञात आहे. सध्या संत तुकारामनगर येथे महापौर चषक नाइन ए साइड फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेस एका स्पोटर््स क्लबचे सहकार्य लाभले आहे. त्या क्लबचे प्रमुख असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वत:ची छबी असलेले फ्लेक्स सर्वत्र लावले आहेत. चमकोगिरीची हौस वेगवेगळ्या पद्धतीने भागवून घेतली आहे. संपूर्ण मैदान, रस्ते आणि मुख्य चौक त्यांच्या छायाचित्रांनी भरून गेले आहेत. एका फ्लेक्सवर ते स्वत: एखाद्या मॉडेलप्रमाणे विविध पद्धतीने फुटबॉल खेळतानाची पाच-सहा छायाचित्रे आहेत. स्पर्धेपेक्षा त्यांच्या या चमकोगिरीची चर्चा सुरू आहे. शहरातील गुणवान खेळाडूंचा त्यांना जाणीवपूर्वक विसर पडल्याचे दिसून येते. यावरून शहरात एकही गुणवान राज्य आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू असित्वात नसल्याचा संदेश नागरिकांसमोर जात आहे. स्पर्धेच्या संपूर्ण खर्चाच्या तुलनेत खेळाडूंना बक्षीस मात्र नाममात्र रकमेची बक्षिसे दिली जातात. त्यातही स्थानिकपेक्षा बाहेरील खेळाडूंचा भरणा अधिक असतो. त्यामुळे स्थानिक खेळाडूंच्या पदरी उपेक्षाच पडते. त्यामुळे स्थानिक क्रीडा क्षेत्रात नाराजीचे चित्र आहे. (प्रतिनिधी)महापालिका ज्या खेळासाठी मान्यता मागेल, त्यास संघटनेतर्फे परवानगी दिली जाईल. फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी संघटना प्रयत्न करीत आहे. शहरात स्पर्धा होत आहे. या भागात स्पर्धेस प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभतो. सध्याचे मैदान नाइन ए साइड स्पर्धेसाठी योग्य आहे. नेहरुनगर येथील एचए कंपनी मैदानावर स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव संघटनेने महापालिकेस दिला होता. त्यावर विचार करण्याची गरज आहे.- प्यारेलाल परदेशी, सचिव, जिल्हा फुटबॉल संघटना
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत चमकोगिरी
By admin | Updated: February 16, 2016 01:19 IST