पिंपरी : आळंदी नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी चार जणांना दिघी पोलिसांनी बुधवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मावस भावानेच खून केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.नगरसेवक बालाजी कांबळे यांची धारधार शस्त्रांनी मंगळवारी भरदिवसा च-होली येथे हत्या करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायाच्या भागिदारीतून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार दिघी पोलिसांनी तपास सुरू केला होता. सध्या हत्या प्रकरणी संशयित म्हणून अजय मेटकरी याच्यासह प्रफुल्ल गबाले, राज खेडकर आणि संतोष माने या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि अजय याने कांबळे यांना शिवीगाळ आणि मारहाणसुद्धा केली होती. त्यामुळे या खूनप्रकरणी अजय हाच संशयित आरोपी असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी मंगळवारी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
नगरसेवक हत्याप्रकरणी चौघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 03:13 IST