देहूगाव : येथील संत तुकाराम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाच्या डोळ्यांत दोन अज्ञात हेल्मेटधारी व्यक्तींनी मिरचीपूड टाकून त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. हल्ल्यात व्यवस्थापक गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोर त्यांची दुचाकीही घेऊन पसार झाले. ही घटना देहू-आळंदी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथील बाणेर सहकारी बँॅकेसमोर घडली. भीमसेन नथू कालेकर (वय ४६, रा. कडूस, ता. खेड, पुणे) असे गोळीबारात जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे. अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालेकर हे देहूगावातील एका बँकेत काही कामानिमित्त निघाले होते. मात्र, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची रोख रक्कम नव्हती. देहूगावात जात असताना ते देहू-आळंदी रस्त्यावरील बाणेर नागरी सहकारी बँकेजवळ आल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कालेकर यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याच वेळी मागून (एमएच ०६ आर ६६२५) क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी कालेकर यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. त्यानंतर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पोटात लागली, तर दुसरी हाताला लागली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम देहूरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)दरम्यान, हल्लेखोर स्वत:ची दुचाकी (एमएच ०६ आर ६६२५) घटनास्थळी सोडून कालेकर यांची दुचाकी (एमएच १४ डीआर ३६५१) घेऊन तेथून पसार झाले. गाडीत कोणत्याही प्रकारची रोख रक्कम नसली, तरी त्यांच्या जवळील चेकबुक हल्लेखोर घेऊन गेले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. घटनेचा तपास सुरू असून ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पेट्रोल पंपावरील व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू आहे.
गोळीबारात व्यवस्थापक जखमी
By admin | Updated: October 25, 2016 06:25 IST