पिंपरी : पिंपरीतील शगुन चौकातील अनधिकृत पथारीधारक व दुकानदारांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. मात्र, काही वेळातच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागालादेखील हे पथारीधारक व दुकानदार दाद देत नसल्याचे यावरून दिसून आले आहे. पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनधिकृत पथारीधारकांवर कारवाई करणार असल्याची माहिती आसवानी यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी या पथारीधारकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, सायंकाळी या परिसरात पथारीधारकांनी पुन्हा दुकाने थाटली. सभापतींनी सूचना केल्यानंतर त्याची प्रशासनाने अंमलबजावणी केल्याचे दिसून आले. मात्र, काही वेळातच या ठिकाणी पुन्हा पथारीधारकांचे अतिक्रमण झाल्याने ही कारवाई निव्वळ फार्सच ठरली. (प्रतिनिधी)पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडी अनेक दिवस चर्चेचा विषय असून, ही कोंडी सोडवावी अशी मागणी होत आहे. येथील बाजारपेठेत नो एंट्रीमधून अवजड वाहने येत असतात. तसेच भाजीमंडईकडून एकेरी वाहतूक असतानाही नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहनचालक गाड्या हाकतात.
अतिक्रमण कारवाईचा फार्स
By admin | Updated: June 16, 2016 04:23 IST