पिंपरी : वीजमीटरमध्ये फेरफार करून रहाटणी येथील पीठ गिरणीत वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरी ओम फ्लोअर मिल हे पीठ गिरणीचे नाव आहे. एकूण ४ हजार १०० युनिट्सच्या ४६ हजार ३४० रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा मिलचे मालक सोमनाथ मारुती कापसे यांच्याविरुद्ध दाखल केला आहे. महिन्याभरात या वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल झालेला हा तिसरा प्रकार आहे. रहाटणी येथे हरी ओम फ्लोअर मिल आहे. ती कापसे यांच्या मालकीची आहे. वीज वितरण कंपनीच्या पिंपरी विभागीय कार्यालयाचे ग्राहक आहेत. मिल- मधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटरमध्ये फेरफार करून गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत ४१०० युनिट्सच्या ४६ हजार ३४० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. मीलचे मालक कापसे यांच्याविरुद्ध रास्ता पेठ, पुणे येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ कलम १३५अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी महिन्याभरात एमआयडीसी, भोसरी व मामुर्डीतील दोन कारखान्यांवर वीज चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)
वीजचोरीचा तिसरा गुन्हा उघडकीस
By admin | Updated: October 28, 2015 23:42 IST