पुणे : पुणे वस्ती शाळांमधील सुमारे ३०० निमशिक्षकांना गेल्या २ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने त्याचा परिणाम निमशिक्षकांच्या मानधनावर झाला. वस्ती शाळांमध्ये हे निमशिक्षक नियुक्त आहेत. सर्व शिक्षा अभियानच्या अंतर्गत त्यांची नियुक्ती होते. वस्ती शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्यापासून या शिक्षकांचे मानधन गटविकास अधिकार्यांमार्फत केले जाते.दीड हजार रूपये इतक्या तोकड्या वेतनावर निमशिक्षक काम करतात.अन्य शिक्षकांइतकेच आणि तितका वेळ त्यांना काम करावे लागते.मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे मानधन न मिळाल्याने या वस्ती शिक्षकांची आबाळ झाली.वस्ती शिक्षकांनी उपाध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडे मानधन न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकार्यांकडून विलंब होत असल्याची माहिती पुढे आली.कंद यांनी या अधिकार्यांना जाब विचारल्यावर त्यांनी संबंधित मानधन तालुका पातळीवर देण्यासाठी जी प्रक्रिया असते ती अवलंबिली गेली नसल्याचे स्पष्ट केले. कंद यांनी गटविकास अधिकार्यांना याबाबत सतर्क करून तातडीने मानधन द्यावे, अशा सूचना शिक्षणाधिकार्यांना केल्या. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे मानधन देण्यात आले आहे.मार्च आणि एप्रिलचे मानधन देता आलेले नाही.त्यामागे शिक्षकांना, अधिकार्यांना निवडणूक कामात महिनाभर व्यग्र राहावे लागणे हे कारण असल्याचे कंद यांनी पत्रकारांना सांगितले.
निवडणुकीमुळे वस्ती शाळातील शिक्षक पगारापासून वंचित
By admin | Updated: May 7, 2014 04:23 IST