चाकण : नोटा बंदीमुळे व्याजाचे पैसे देऊ न शकल्याने खासगी सावकारीचा गुन्हा उघड झाला असून, दोन महिन्याचे व्याजाचे पैसे न दिल्याने फियार्दीस मारहाण करून पत्नी व मुलीला शिवीगाळ केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बापू तेलंग (वय ४२, रा. साईसमृद्धी, डी विंग, फ्लॅट नं. १०७, चाकण) यांनी दिलेल्या फियार्दी वरून संदीप शेवकरी (पूर्ण नाव नाही, रा. चाकण ) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आॅगस्ट ते डिसेंबर २०१६ या कालावधीत घडला. फियार्दी तेलंग याने आर्थिक अडचणीमुळे शेवकरी यांच्याकडून १० टक्के व्याजदराने ५० हजार रुपये घेतले होते. त्याप्रमाणे दोन महिन्याचे दहा हजार रुपये व्याज दिले. मात्र सध्याच्या नोटबंदीमुळे बँकेत पैसे मिळण्यास अडचण होत असल्याने व्याजाचे पैसे देता आले नाही, या कारणावरून आरोपीने फियार्दीची पत्नी व मुलीस फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली. व फियार्दीस हाताने मारहाण केली. याप्रकरणी सावकारी अधिनियम ३२ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र मोरे हे पुढील तपास करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार सी.एम. गवारी यांनी दिली.
खासगी सावकारीचा गुन्हा उघड
By admin | Updated: December 22, 2016 01:37 IST