पिंपरी : आपल्या प्रभागातील व्यक्तींची मर्जी सांभाळण्यासाठी अमूकच एका प्रेक्षागृहाची तारीख मिळावी म्हणून लोकप्रतिनिधी प्रेक्षागृहाचा अट्टहास करतात. प्रेक्षागृह मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने प्रयत्न केला जातो. ऐनवेळेस संबंधित व्यक्तीच्या तारखांत बदल केल्याने प्रेक्षागृहात वादाचे प्रसंग निर्माण होतात. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या व्यवस्थापकावर तारखा बदलण्याचा वारंवार तणाव येत आहे. मोरे प्रेक्षागृह मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ते मिळविण्यासाठीच लोकप्रतिनिधींचा दबाव प्रेक्षागृहांच्या व्यवस्थापकांवर येत असल्याचे समोर आले आहे. प्रेक्षागृहाची तारीख शिल्लक नाही, असे पदाधिकाऱ्यांना सांगितल्यास ते प्रेक्षागृहाची तारीख संबंधित कार्यक्रम असलेल्या व्यक्तीस ऐनवेळी बदलण्यास सांगतात. अशा वेळी ज्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे, त्या व्यक्तीची मोठी अडचण निर्माण होते. सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांसाठीच प्रेक्षागृह उपलब्ध नाही असा त्याचा अर्थ होतो. सर्व कार्यक्रमाची तयारी झाली असतानाही ऐनवेळी तारीख बदलण्यास सांगितल्याने नागरिकांचा मोठा गोंधळ उडतो. नागरिक हतबल होतात. मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मारा अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. एखाद्या लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम आहे, असे सांगितल्यास समोरील व्यक्तीही घाबरून जाते. माघार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. यापूर्वी आकृतीबंधाप्रमाणे प्रेक्षागृहांसाठी लिपिक पदाची जागा देण्याचे महासभेत मंजूर झाले होते. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाने प्रेक्षागृहात लिपिक पदाची जागा भरलेली नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळी व्यवस्थापनावर चांगलाच ताण येतो. चिंचवडच्या प्रेक्षागृहात सतत कार्यक्रम असल्याने प्रेक्षागृहाची साफसफाईदेखील व्यवस्थित होत नाही. एकाच प्रेक्षागृहाला वारंवार मागणी असल्यानेच प्रेक्षागृहाचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह व वल्लभनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराला कार्यक्रमासाठी प्रतिसाद मिळत नाही. यावर प्रशासनाने तोडगा काढणे आवश्यक आहे. प्रेक्षागृहात एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत ११६ नाटकांचे प्रयोग झाले. इतर कार्यक्रमांची संख्या ३३८ आहेत. यामाध्यमातून आठ महिन्यातच ३५ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. गतवर्षी ४२ लाख ८२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.(प्रतिनिधी)
प्रेक्षागृहांच्या तारखाबदलाने वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:18 IST