पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागताच श्रेयासाठी चढाओढ सुरू झाली आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आतापासूनच वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. आंदोलनाची जणूकाही स्पर्धाच लागली असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी अवघा आठ महिन्यांचा अवधी उरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. नागरिकांच्या हिताचा जणूकाही आपल्यालाच कळवळा आहे, नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपणच तत्पर आहोत, हे दाखविण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची काहींनी तयारी ठेवली आहे, याचा प्रत्यय पदोपदी येत आहे. चिखली-मोरेवस्ती भागात नागरी सुविधांची वानवा आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी इच्छुकांपैकी एकाने कार्यकर्त्यांचा गोतावळा घेऊन आंदोलन केले. ज्यांना वॉर्डाचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले ते कसे अकार्यक्षम आहेत, हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. हे आंदोलन होणार हे समजताच, प्रतिस्पर्ध्यांनी संबंधिताच्या अवैध धंद्यांकडे लक्ष वेधले. भर लोकवस्तीच्या भागात बिअर शॉपी सुरू करून तेथेच मद्यपींसाठी अड्डा तयार केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्याच रात्रीत आंदोलनाची तयारी झाली. एकाच दिवशी शेजारी शेजारी दोन आंदोलने झाल्याचे चित्र चिखलीकरांना पहावयास मिळाले. बोपखेल पीएमपीसाठी आणखी एकाने आपणच पाठपुरावा केल्या असल्याचा दावा केला. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावरील तारखा पाहिल्यास कोणी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला, हे निदर्शनास येते. आपली काय चूक होत आहे, याची भान राहिले नाही. (प्रतिनिधी)बोपखेल येथील तरंगता पूल संरक्षण खात्याने काढला. बोपखेलवासीयांची दळणवळणाची गैरसोय झाली. या मार्गावर पीएमपीने तातडीने बससेवा सुरू करावी, अशी नागरिकांची अपेक्षा होती. त्या संदर्भात पत्रव्यवहार सुरू झाला. पीएमपी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे १४ जूनपासून बोपखेल-दापोडी बससेवा सुरू झाली. ही बससेवा आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली, हे दाखवून देण्याचा प्रयत्न एकाने केला.
निवडणुकीच्या रिंगणात श्रेयवादाच्या आणाभाका
By admin | Updated: June 16, 2016 04:24 IST