पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांना ‘सौजन्याचे वावडे’ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उद्धट उत्तरे मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून याची दखल संबंधित ‘सीआरओ’ घेत नसल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलिसांचा १०० क्रमांक मोडतो. या क्रमांकावर दिवसभरात काही हजारांच्या पटीत फोन येतात. ब-याचदा हा क्रमांक ‘एंगेज’च लागतो. नियंत्रण कक्षातील पोलीस हे फोन उचलतात. तेव्हा ज्याला काही माहिती द्यायची असते त्यालाच पोलिसांकडून प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महत्वाची माहिती हवी असते तेव्हाही उर्मटपणे उत्तरे दिली जातात. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद पोलीस दल लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करीत असताना नियंत्रण कक्षाकडून सौजन्याने बोलण्याचे सोपस्कारही पुर्ण होत नाहीत. (प्रतिनिधी)
नियंत्रण कक्षाला सौजन्याचे वावडे
By admin | Updated: September 21, 2015 04:02 IST