रहाटणी : मागील अनेक दिवसांपासून रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे काही वेळा घरातील विद्युत उपकरणेही नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. या परिसरातील अनेक ठिकाणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मर झाडी-झुडपांच्या विळख्यात दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अनेक वेळा विद्युतपुरवठ्याचा खेळखंडोबा होत असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.रहाटणी पवनानगर येथे नागरी वस्तीच्या शेजारी दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर आहेत. एखाद्या वेळेस काही दुरुस्ती करायची आसल्यास त्या ठिकाणी जाता यावे म्हणून त्याला लोखंड गेट बसविण्यात आले आहे. मात्र, त्या गेटवर मोठ्या प्रमाणात गवत, वेली तयार झाली असल्याने आत सहजासहजी आत प्रवेश करणे कठीण आहे. या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच नागरी वस्ती आहे. एखाद्या वेळेस या ठिकाणी अपघात घडण्याची भीती रहिवासी व्यक्त करीत आहेत. मागील पावसाळ्यात या विद्युत ट्रान्सफॉर्मरपैकी एक पवना नदीपात्रात पडला होता. हा विद्युत ट्रान्सफॉर्मरही झाडी, वेलीने वेढला गेला होता. त्या वेळीसुद्धा मोठी कसरत करावी लागली होती. तरी महावितरण कंपनीचे अधिकारी बोध घेताना दिसून येत आहेत. या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कंपाउंडमध्ये झाडी, वेली, गवत मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नदीकाठावरच हे विद्युत ट्रान्सफॉर्मर असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीने नागरिक हैराण आहेत. अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कल्पना देऊनही याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. यापेक्षाही भयावह परिस्थिती रहाटणी चौकातून रहाटणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत ट्रान्सफॉर्मरची आहे . त्या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे की नाही, हेच कळत नाही. विद्युत ट्रान्सफॉर्मर, विद्युततारा या झाडाने व वेलीने व्यापल्या आहेत. (वार्ताहर)अन्... विद्युतपुरवठा खंडित केला जातोमागील अनेक महिन्यांपासून दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही. ते जेव्हा दुरुस्ती करतील, तेव्हा करतील. त्यांना नागरिकांनी जाब विचारू नये, असे येथील अधिकाऱ्यांचे वर्तन आहे. मात्र, एखाद्या वेळेस वीज बिल वेळेवर भरले गेले नाही, तर मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता लगेच मीटरमधून विद्युतपुरवठा खंडित केला जातो. मग बिल भरून आगाऊ शंभर रुपयांची पावती करून पुन्हा वीजपुरवठा सुरूकरून घ्यावा लागतो. यात जशी तत्परता दाखवितात, तशीच तत्परता वीजपुरवठा खंडित झाल्यावरही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी दाखवावी, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.झीरो टक्के थकबाकीरहाटणी, पिंपळे सौदागर गावातील अनेक नागरिक सर्वसामान्य आहेत. काही नागरिकांच्या अडचणींमुळे एखाद्या वेळी बिल भरणा वेळेवर होत नाही. मात्र, विद्युतपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी घरी लगेच हजर होतात. मात्र, जे नागरिक सकाळी कामाला जातात, ते रात्रीच घरी परत येतात, तेव्हा त्यांच्या घरात लाइटच नसते. तेव्हा त्यांना कळते की, आपला विद्युतपुरवठा खंडित केला आहे. अनेक नागरिक रात्रीच महावितरणच्या कार्यालयात रात्री बारा वाजेपर्यंत पैसे भरताना अनेक वेळा दिसून येतात. हीच तत्परता अधिकाऱ्यांनी विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर दाखवावी.
शहरात महावितरणचा भोंगळ कारभार
By admin | Updated: August 31, 2016 01:00 IST