राजेंद्र काळोखे, देहूगाव संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यानिमित्त देहूनगरीचा नूर काही औरच होता. अखंड हरिनामाच्या गजराने अवघी देहूनगरी भक्तिरसात चिंब झाली होती. सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची देहूकर आणि विविध सामाजिक संस्थांनी मनोभावे सेवा केली. विविध सेवा देण्याबरोबरच महाप्रसाद, अन्नदानाचे वाटप करून सेवेचे पुण्य मिळविले. पालखी सोहळ्यानिमित्त येथील मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर, परिसरातील इंद्रायणी काठ, गावातील सर्व रस्ते व देहू-आळंदी रस्ता भाविकांनी फुलून गेला होता. सोहळ्यात सहभागी भाविकांनी फुगडीसाठी फेर धरला. यामध्ये कोणी तरुण व म्हातारे, जात-पात, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न ठेवता आनंद लुटताना दिसत होते. पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणच्या वतीने दोन वेळा पुरवठा केला. शासनाच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर उभे करून त्यांद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात होते. श्री संत तुकाराममहाराज जन्मस्थानाकडील भागात, गाथा मंदिर रस्त्यावर सार्वजनिक नळकोंडाळे काढण्यात आले होते. रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्यकेंद्रात बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग सुरू ठेवला होता. याशिवाय गाथा मंदिर रस्ता, वैकुंठगमन मंदिर, मुख्य मंदिर परिसरात बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात आला होता. गावातील हॉटेलच्या अन्नपदार्थांची तपासणी केली होती व त्यांनाही मेडीक्लोर टाकलेलेच पाणी वापरण्याच्या सक्त सूचना केल्या होत्या. ठिकठिकाणी दिंड्यांचा मुक्काम आहे. या ठिकाणी स्थानिक पातळीवर विद्युतपुरवठा करण्यात आला होता. आज दिवसभर विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यात विद्युत विभाग यशस्वी झाल्याचे दिसून येत होते.
देहूनगरी भक्तिरसात चिंब
By admin | Updated: July 9, 2015 02:42 IST