रहाटणी : पिंपळे सौदागर येथील पी के चौक रस्त्यावरील चेंबर मागील अनेक दिवसांपासून तुटलेले आहे. या परिसरात दोन शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. तसेच दिवसभर या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मागील अनेक दिवसांपासून वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून, या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने परिसरातील रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.विकास आराखड्यात हा डीपी रस्ता नियोजित असला, तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे, खडी, मुरूम असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अगदी वळणावर रस्त्याच्या मधोमध हे पावसाचे पाणी निचरा करणाऱ्या पाइपलाइनचे चेंबर आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार हे चेंबर तुटते. मागील अनेक दिवसांपासून हे चेंबर तुटले आहे. या रस्त्यावर दोन शाळा असून, दररोज सुमारे एक हजार विद्यार्थी ये-जा करतात. तसेच हजारो वाहनांची वर्दळ असते. हे चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने सर्वांनाच जीव मुठीत धरून ये-जा करावे लागत आहे. चेंबर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे यात एखादे वाहन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढी भयावह परिस्थिती होऊनही पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून आहे. ही पट्टी निघणार कधी, असा सवाल नागरिक व वाहनचालक उपस्थित करीत आहेत. अपघात होण्याच्या अगोदर या चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)
चेंबर तुटल्याने अपघाताची शक्यता
By admin | Updated: March 23, 2017 04:21 IST